धक्कादायक ! भाजपच्या माजी ‘शहराध्यक्षा’च्या भावाची पोटच्या 2 मुलांवर ‘गोळ्या’ झाडून ‘आत्महत्या’

बल्लारपूर/चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कौटुंबिक कलहातून एका पित्याने अगोदर आपल्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्या व त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बल्लारपूर शहरात घडली आहे. बल्लारपूर शहरातील भगतसिंग वॉर्डात आज (मंगळवार दि.28) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलावर चंद्रपूर येथील शासकिय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे बल्लारपूर शहरात खळबळ उडाली आहे.
मुलचंद द्विवेदी (वय-47) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर छातीत गोळी लागल्याने मुलगा आकाश (वय-21) याचा मृत्यू झाला आहे. पवन (वय-15) हा गंभीर जखमी झाला आहे. मुलचंद द्विवेदी हे नागपूर येथे नोकरीला होते. कोरोना लॉकडाऊनमुळे ते बल्लारपूर येथे अडकून पडले होते. ते भाजपचे बल्लारपूर शहराचे माजी अध्यक्ष शिवचंद द्विवेदी यांचे भाऊ आहेत.

Advt.

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे. वेकोली वसाहत परिसरातील भगतसिंग वॉर्डात शांतता असल्याने अचानक बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज परिसरातील लोकांच्या कानी पडला. गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकल्याने लोकांनी घराबाहेर पडत द्विवेदी यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. यानंतर घरात पाहीले असता मुलचंद हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होत. तर मुलेही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

नागरिकांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी पवन याला बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलवलं. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. पोलिसांनी मृत मुलचंद आणि आकाशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत. दरम्यान, ही घटना कौटुंबिक कलहातूनच घडल्याची चर्चा परिसरात आहे.