भाजपचे माजी मंत्री संपर्कात असून येत्या आठवडाभरात मोठे बदल, नवाब मलिकांचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी होत असताना भाजपकडून पुन्हा ऑपरेशन लोटस सुरु होणार असल्याची चर्चा आहे. तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार फार काळ टिकणार नाही त्यामुळे मध्यावती निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, भाजपची लाट ओसरली आहे. अनेक माजी मंत्री महाविकास आघाडीच्या संपर्कात असून येत्या आठवड्याभरात मोठे फेरबदल पहायला मिळतील असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नवाब मलिक यांनी हा दावा केला आहे. भाजपची लाट ओसरली असून अनेक माजी मंत्री शिवसेनेत येण्यास इच्छूक आहेत. येत्या आठवड्याभरात मोठे फेरबदल झाल्याचे पहायला मिळतील असा दावा त्यांनी केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तापालट होईल अशी बातमी सध्या पेरली जात आहे. महाराष्ट्राचे नेते दिल्लीत प्रचार करत आहेत मात्र त्यांची बोट महाराष्ट्रातच बुडणार असे नवाब मलिक यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, यातील काही नेते पुन्हा घरवापसीच्या विचारात आहेत. तसेच पक्षासाठी मेहनत घेऊन ही अन्याय झाला असल्याची भावना असणारे नेतेही पक्ष बदलण्याच्या मनस्थितीत आहेत असे सांगत त्यांनी भाजपमधील नाराजांकडे बोट दाखवले. नाराज नेते महाविकास आघाडीत येण्यास इच्छूक असून आठवड्याभरात हे भाजपला समजेल असे देखील त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका करताना लोकांना माहित आहे कोणी विश्वास घात केला. ज्यांना वाटत असेल हे सरकार जास्त काळ चालेल तर असे काही होणार नाही. त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान मध्यावती निवडणुका झाल्या तर कोणी कोणाचा विश्वास घात केला हे लोकच सांगतील असे त्यांनी म्हटले होते.