जमिनीच्या वादावरून भाजपच्या माजी आमदार व नगरसेवकांसह 40 जणावर FIR दाखल

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन – तोदिवाडी जमिनीचा बळजबरी ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी भाजपचे नगरसेवक प्रशांत केळुस्कर, मेहता समर्थक संजय थरथरे आणि इतर ४० जणांवर मंगळवारी रात्री भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२७ हजार १९० हजार चौ.मी.चा भाईंदरच्या तोदिवाडीत भूखंड असून या भूखंडावरून मंगळवारी सायंकाळी वाद झाला होता. या वादाची माहिती कळताच भाईंदरमध्ये विसर्जन व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आलेले पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील सह स्थानिक पोलीस अधिकारी व मोठा पोलिसफाटा घटनास्थळी पोहचला होता. पोलिसांनी तेथून जमाव पांगवला. घटनास्थळी स्वतः मेहता, केळुस्कर आदी उपस्थित होते.

या प्रकरणात जमिनीचे मालक असलेले श्यामसुंदर अग्रवाल यांनी फिर्याद दिली. त्यानंतर भाजपाचे नरेंद्र मेहता, प्रशांत केळुसकर, संजय थरथरे आणि इतर ३५- ४० जणांविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. अग्रवाल यांच्या फिर्यादीनुसार सदर जमिनीची मालकी आणि ताबा त्यांचा असून तसे फलक लावले होते. परंतु मेहता व साथीदारांनी सदर जमिनीचा कब्जा घेण्यासाठी अचानक जमून रखवालदारास मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

आज बुधवारी माजी नगरसेवक प्रशांत केळुस्कर यांनी सांगितले की, “ही जागा आम्ही खरेदी केली असून आमचे वॉचमन तेथे आहेत. जागेत बाहेरची काही माणसे घुसल्याचे कळल्याने आम्ही देखील तिकडे गेलो होतो. आमची फिर्याद आज पोलिसांना दिली असून गुन्हा दाखल केला जात आहे. स्वतः पोलीस अधीक्षक घटनास्थळी येतो याचा अर्थ राजकीय दबावाखाली आमच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप केळुस्कर यांनी केला.