भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे कोरोनाने निधन

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – डहाणूचे भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे (रा. तलासरी) यांचे कोरोनामुळे सोमवारी (दि. 12) निधन झाले. मुंबईतील नानावटी रुग्णालयात पहाटे 3 सुमारास त्यानी अखेरचा श्वास घेतला. धनारे यांच्या निधनामुळे भाजप आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.

काही दिवसापूर्वी पास्कल धनारे यांना कोरोनाची बाधा झाली होती. गुजरातच्या वापी जिल्ह्यातील रेनबो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खलावल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिथेच उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. धनारे 2014 च्या विधानसभा निडणूकीत डहाणू मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. या मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व असताना मोदी लाटेत प्रथमच भाजपला येथे विजय मिळाला होता. धनारे भाजपचे पालघर जिल्हाध्यक्षही होते.