भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे लोकप्रिय माजी आमदार सरदार तारासिंह यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे. लिलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यानं सरदार तारासिंह यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांची प्रकृती अचाकन खालावली. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.

भाजपचे माजी खासदार किरीट सौमय्या यांनी तारासिंह यांच्या निधनाची बातमी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. आज दुपारी मुलूंड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोण होते सरदार तारासिंह ?
तारासिंह हे अत्यंत लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी जनसंघातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती आणि अनेक पदं भूषवली होती. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या तारासिंह यांनी मुलूंड विधानसभेचं दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलं.