भाजपच्या इनकमिंगला ‘ब्रेक’ ! आउटगोईंग सुरु, राष्ट्रवादीच्या खेळीनं भाजपला धक्का

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु असताना भाजपमधून आउटगोईंग सुरु झाले आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमधील भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश कण्याच्या मार्गावर आहेत. नागपूर जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेटही घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या प्रवेशामुळे नागपूरमध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.

आज सकाळी एका हॉटेलमध्ये विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेश बंग यांची भेट घेतली. भेटीतील चर्चेचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. पण विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविण्यासाठी ही भेट असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादीत येत असताना राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात धक्का बसण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपक आबा साळुंखे यांनी राजीनामा दिला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

2009 मध्ये घोडमारे भाजपकडून निवडून आले होते. तरीही 2014 च्या निवडणूकीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांना थांबण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यावेळी त्यांना विधानपरीषदेचे आश्वासनही देण्यात आल्याची माहिती आहे. कदाचित ज्येष्ठांनी दिलेला शब्द पाळला नसावा आणि यंदाच्या निवडणूकीत पक्षाकडून तिकीट मिळण्याची कुठलीही शक्यता नाही. त्यामुळे घोडमारेंनी हे पाऊल उचलले असावे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like