माजी भाजपा आमदाराची रेल्वेत गोळ्या झाडून हत्या

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाचे माजी आमदार आणि माजी उपाध्यक्ष जयंतीलाल भानुशाली यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. ही घटना कटारिया-सुरबरी रेल्वे स्थानकादरम्यान सयाजी नगरी एक्स्प्रेसमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे माजी आमदार जयंतीलाल भानुशाली हे भूजहून अहमदाबादला जाण्यासाठी सयाजी नगरी एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. त्यावेळी कटारिया-सुरबरी रेल्वे स्थानकादरम्यान काही अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी अगदी जवळून दोन गोळ्या झाडल्या. त्या त्यांच्या छातीत घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी तपास करत आहेत.

जयंतीलाल भानुशाली हे गुजरात भाजपाच्या उपाध्यक्षपदी होते. मात्र, गेल्या वर्षी सुरतमधील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना फॅशन डिझाइनमध्ये प्रवेश देण्यासाठी अश्लील व्हिडीओ क्लिप बनवत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप सुरतमधील एका तरुणीने केला होता. त्यामुळे त्यांना भाजपाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.  मात्र, आता त्या तरुणीने हायकोर्टात अर्ज करुन आपल्याला ही केस पुढे लढवायची नसल्याचे सांगितले आहे.