BSF चे माजी जवान तेजबहादूर यादव JJP मधून बाहेर, BJP ला समर्थन दिल्याचा ‘निषेध’

चंडीगड : वृत्तसंस्था – हरियाणात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला पाठिंबा देऊन जननायक जनता पार्टीने मतदारांचा विश्वासघात केल्याचा आरोप करुन सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ)चे माजी जवान तेजबहादूर यादव यांनी या पक्षाचा त्याग केला आहे.

सैनिकांना दिल्या जाणाऱ्या  अन्नाच्या दर्जाबद्दल तक्रार करणारी चित्रफीत समाजमाध्यमावर टाकल्यानंतर यादव यांना २०१७ मध्ये बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आले होते. त्यांनी २०१९ मध्ये वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध निवडणुक लढविण्याचा प्रयत्न केला होता. समाजवादी पक्षाने त्यांना उमेदवारीही दिली होती. मात्र, निवडणुक आयोगाने त्यांचा अर्ज बाद ठरविला होता.

त्यानंतर आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याविरुद्ध कर्नाल मतदारसंघातून विधानसभेची निवडणुक लढविण्यासाठी त्यांनी जे जे पीमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीत ३ हजार १७५ मते मिळवून ते तिसऱ्या  क्रमांकावर राहिले.

याबाबत तेजबहादूर यादव यांनी सांगितले की, तुम्ही भाजपशी समझोता केला, तर मी पक्ष सोडेन. जे जे पी ही भाजपाची बी टीम असल्याचे आता स्पष्ट झाले आहे़, असे सांगून यादव यांनी भाजपाला पाठिंबा दिल्याबद्दल दुष्यंत चौटाला यांच्यावर टिका केली आहे. भाजपाला पाठिंबा देऊन त्यांनी मतदारांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.