मायावतींची चंद्रावर जमीन असल्याचे सांगणाऱ्या पिंटू सेंगरचा भरदिवसा गोळ्या घालून खून

कानपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रेदशमधील कानपूर येथे आज (शनिवार) दुपारी बहुजन समाज पार्टीचे माजी नेते नरेंद्र सिंह उर्फ पिंटू सेंगर यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. कानपूरमधील चकेरी येथे हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संबंधित परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नरेंद्र सिंह उर्फ पिंटू सेंगर हे दुपारी जाजमऊ येथील केडीए आशियाना कॉलनीजवळ आपल्या इनोव्हा कारमधून उतरून फोनवर बोलत होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

त्यामुळे रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत पिंटू सेंगर घटनास्थळीच कोसळले. तर हल्लेखोरांनी रस्ता मोकळा असल्याचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा केला असता त्यांना काही काडतुसं आढळून आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दिनेश कुमार प्रभू, पोलीस अधीक्षक पूर्वी यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरु असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. मूळचे गोगूमऊ येथील निवासी असलेले नरेंद्र सिंह उर्फ पिंटू ठाकूर चकेरी येथील मंगला बिहारमध्ये राहत होते.

बसपाच्या तिकीटावर त्यांनी छावणी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. पिंटू ठाकूर हे तेव्हा चर्चेत आले होते जेव्हा त्यांनी माजी मुख्यमंत्री व बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांना चंद्रावर जमिनीचा तुकडा देण्याचे म्हटले होते. यानंतर ते बसपाच्या राजकारणात सक्रीय झाले होते. 2007 मध्ये पिंटू यांनी बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. बसपा जिल्हाध्यक्ष राम शंकरक कुरील यांनी सांगितले की, नरेंद्र सिंह उर्फ पिंटू ठाकूर सध्या पार्टीचे सदस्य नव्हते, त्यांना पक्षातून काढले होते.