CBI चे माजी सह संचालक जेडी लक्ष्मीनारायण यांचा जनसेना पार्टीत प्रवेश

वृत्तसंस्था : सीबीआयचे माजी सह संचालक जेडी लक्ष्मीनारायण यांनी आज (रविवारी) पवन कल्याण यांच्या जन सेना पार्टीत (JSP) प्रवेश केला आहे. विजयवाडा येथील पक्षाच्या कार्यालयात श्रीकृष्ण देवराय विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजगोपाल यांच्यासह त्यांनी प्रवेश केला. जेडी लक्ष्मीनारायण यांनी महाराष्ट्रात अप्पर पोलिस महासंचालक म्हणून काम पाहिले होते. त्यांनी मार्च २०१८ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते.

जेडी लक्ष्मीनारायण यांनी वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांच्या मालमत्ता प्रकरणात आणि कर्नाटकचे भाजप नेते गली जनार्दन रेड्डी यांचे ओबुलपुरम अवैध खणन प्रकरणात चौकशी केली होती. सीबीआयने त्यावेळी जगनमोहन रेड्डी यांना अटक केली होती. लक्ष्मीनारायण हे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी सीबीआयचे सह संचालक म्हणून आंध्र प्रदेशात काम केले होते.

स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर लक्ष्मीनारायण यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा संकेत देत शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करून राज्यभर विविध कामाचा आढावा घेतला. जन सेना पार्टीचे प्रमुख पवन कल्याण यांनी जेडी लक्ष्मीनारायण आणि राजगोपाल यांचे पक्षाचे स्वागत केले.”आमचा देश तरुणांबरोबर आहे. जर आम्ही त्यांना शिक्षित केले तर भारत एक महाशक्ती असेल. मला आश्चर्य वाटते की पवन यांनी आजपर्यंत जन सेना पार्टीच्या घोषणापत्राची रचना कशी केली. पैसे न घेता निवडणूक लढवण्याचा पवन कल्याण यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. आजपासून जन सेना पार्टीचा एक भाग म्हणून मला आनंद होत आहे. जन सेना काय आहे हे मी लोकांना दाखवतो,” असे जेडी लक्ष्मीनारायण यावेळी म्हणाले. लक्ष्मीनारायण हे १९९० च्या बॅचचे पोलीस अधिकारी असून मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत.

नांदेड आणि पुणे येथे पोलीस अधीक्षक, राज्य दहशतवादविरोधी पथक तसेच महाराष्ट्र पोलीस दलात त्यांनी विविध ठिकाणी कर्तव्य बजावले आहे.