कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची 9 वर्षांनी पालिकेत एन्ट्री, नव्या राजकारणाची नांदी

कऱ्हाड : पोलीसनामा ऑनलाइन –   कऱ्हाड महापालिकेत रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण पालिकेत आले होते. पृथ्वीराज चव्हाण हे तब्बल नऊ वर्षानंतर पालिकेत आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकेत त्यांच्या निधीतून मिळालेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना 2012 मध्ये ज्येष्ठ नेते (कै) पी.डी. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी आले होते. त्यानंतर ते पालिकेत आले नव्हते. चव्हाण यांच्या पालिकेत लावलेली उपस्थिती ही नव्या राजकारणाची नांदी असल्याची चर्चा आहे.

आमदार पृथ्वीराज चव्हाण गट मागील चार दिवसांपासून रुग्णवाहिकेच्या प्रश्नावरुन सक्रिय झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण यांच्या पालिकेतील उपस्थितीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार पृथ्वीराज चव्हाण हे पालिकेत आले असता नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील यांच्यासह भाजप व लोकशाहीचे सर्व नगरसेवकांनी त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. मात्र, जनशक्ती आघाडीतील राजेंद्र यादव, उपाध्यक्ष जयवंत पाटील यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

2016 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेले जाधव, यादव आणि पाटील यांच्या गटाने एकत्रित निवडणूक लढवली. ही निवडणूक ‘लोकशाही’ व भाजप विरोधी होती. या निवडणुकीत जनशक्तीला बहुमत मिळाले होते. मात्र निकालानंतर तिसऱ्याच दिवशी जनशक्तीने फारकत घेतली होती. ती आज देखील कायम आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत यादव आणि पाटील गट चव्हाण यांच्यापासून अधिकच दूरवला. काही मोजकेच नगरसेवक चव्हाण यांच्यासोबत होते. त्यामुळे महापालिकेतील राजकारण बदलले.

आजच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या पालिकेत एन्ट्रीने पालिकेतील राजकारणाची ही नवी नांदी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. विरोधी लोकशाहीसह जाधव गट, भाजपने देखील चव्हाण यांच्या स्वागताला हजरी लावली होती. त्यामुळे याची जोरदार चर्चा रंगली आहे. याशिवाय चव्हाण गटातील इच्छूकांची देखील पालिकेत गर्दी झाली होती. हा देखील विषय चर्चेचा ठरला आहे.