राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे आज निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांनी १९८० – ८१ मध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. तसेच हरियाणा आणि बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. तसेच ते केंद्रीयमंत्रीही होते.

पहाडियांच्यावर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नीवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. पहाडिया यांच्या निधनाने मला खूप धक्का बसला. त्यांचे सुरुवातीपासून माझ्यावर खूप प्रेम होते. पहाडिया यांचा मृत्यु हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. राजस्थानमध्ये एक दिवस दुखवटा जाहीर करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पहाडिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.