राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाची मंत्रिपदासाठी चर्चा, पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना मंत्रीपद गमवावे लागले. संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेतृत्व करत आहेत. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजात नाराजी पसरू नये यासाठी पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा होत आहे. इंद्रनील नाईक हे सध्या अधिवेशनासाठी मुंबईत आहे. या प्रकरणावर नाईक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी सध्या अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत आहे. आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की, संजय राठोड या प्रकरणाच्या चौकशीतून सुखरुप बाहेर पडतील. दरम्यान पक्षाने जबाबदारी दिली तर ती स्वीकारु असेही नाईक यांनी सांगितले.

आजपर्यंत राज्यात बंजारा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये वसंतराव नाईक, मनोहरराव नाईक, संजय राठोड यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. बंजारा समाजाची नाईक कुटुंबावर श्रद्धा आहे. याशिवाय इंद्रनील नाईक हे मनोहरराव नाईक यांचे पूत्र आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार इंद्रनील नाईक यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर संजय राठोड यांच्या खात्याचा चार्ज तात्पुरता अन्य कॅबिनेट मंत्र्याकडे देण्याची शक्यता आहे. याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. तूर्तास तरी कॅबिनेट मंत्रिपदाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.