BJP चे माजी शहराध्यक्ष प्रा. सुभाषचंद्र शिंदे यांची गळफास घेऊन आत्महत्या, भाजप वर्तुळात मोठी खळबळ

कोपरगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते तथा कोपरगाव शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. सुभाषचंद्र आनंदराव शिंदे ( वय 75 ) यांनी राहत्या घरी पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (दि. 27) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रा. शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या आत्महत्येमुळे भाजप वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान प्रा. शिंदे यांच्या खिशात एक चिट्ठी सापडली आहे. त्यात नेमके काय लिहिले आहे, याची माहिती देण्यास पोलिसांनी टाळले असून त्यानुसारच पुढील तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले आहे. प्रा. शिंदे यांचे राज्यभरातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी व्यक्तिश: जवळचे संबंध होते. प्रा. शिंदे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून, एक मुलगी, दोन नातवंडे असा परिवार आहे.