‘स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी केलं ‘ते’ वक्तव्य’ – अजित पवार

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पेट्रोल- डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात असते हे देशातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे स्वतःच अपयश लपवण्यासाठी फडणवीसांनी असे वक्तव्य केल्याची टीका उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.

केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार करण्यासारखी स्थिती आहे. त्याच समर्थन करता येत नसल्याने राज्य सरकारबद्दल फडणवीस असे वक्तव्य करत आहेत. यावेळी त्यांनी वीज दराबाबतही भाष्य केले. वीज दराबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून शेतकऱ्यांची 45 हजार कोटीची थकबाकी होती, त्यातील केवळ 15 हजार कोटी शेतकऱ्यांनी भरायचे आहेत. 30 हजार कोटी रुपये माफ केल्याचे पवार यांनी सांगितले.

आपल्याला घटनेने स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिला आहे. त्यामुळे सेलिब्रेटींनी काय ट्विट् करावे हा त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल आम्हाला टिप्पणी करण्याची गरज नाही. उलट दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे एवढ मोठ आंदोलन पेटल असतानाही सरकारने अर्थसंकल्पात त्यांना काही दिल नसल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. तसेच एल्गार परिषदेत बोटचेपी भूमिका घेतल्याचा फडणवीस यांनी आरोप केला. त्यावर बोलताना सरकार बोटचेपी भूमिका घेणारे नाही. सरकार कठोर पावले उचलून पुढे चालले आहे. कोरोनाच्या काळात एल्गार परिषदेबाबत काय भूमिका घेतली ते आपण पाहिले आहे. एल्गार परिषदेत जे झाले त्याबाबत सरकारने गुन्हा दाखल केला असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.