केरळची महिला नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार !

त्रिवेंद्रम : वृत्तसंस्था – केरळमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून महिलांना न्याय मिळला नसल्याचा आरोप करुन केरळ महिला काँग्रेसच्या राज्य प्रमुख लतिका सुभाष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच राज्याच्या काँग्रेस कार्यालयाबाहेर मुंडन करत पक्षाचा निषेधही व्यक्त केला होता. काँग्रेसवर नाराज असलेल्या लतिका सुभाष या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे केरळ प्रदेशाध्यक्ष पी. सी. चाको यांच्यासोबत लतिका सुभाष यांची चर्चा झाली असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य असलेले चाको यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकत मार्च महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. चाको यांनी 10 मार्च रोजी काँग्रेसचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. चाको यांनी ऐन निवडणुकीच्या काळात मुंबईत येऊन शरद पवार यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीवरून गटबाजी झाल्याचा आरोप चाको यांनी केला होता.

लतिका सुभाष यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, जो काँग्रेसच्या परंपरेशी जोडलेला आहे. याशिवाय चाकोंसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासोबत चर्चा केली. लवकरच माझ्या निर्णयाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

लतिका सुभाष यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होणार आहे. त्यामुळे त्यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सुभाष या 6 एप्रिलला झालेल्या विधानसभा निवडणुकीत एत्तुमानूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभ्या होत्या. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपण अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसल्याची घोषणा केली होती.