…म्हणून काँग्रेसचा हात सोडत प्रियंका चतुर्वेदींनी बांधले ‘शिवबंधन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला रामराम करीत शिवसेनेत प्रवेश केला. पण त्यांनी शिवसेना पक्षातच का प्रवेश केला याचा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना प्रवेशांतराच्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. मला होणारा त्रास मी काँग्रेस पक्ष नेतृत्वाला कळवला होता. ज्यांनी मला त्रास दिला त्यांना निलंबित केल्यानंतर पुन्हा पक्षात घेतले याचा मला जास्त त्रास झाला, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी बोलताना चतुर्वेदी म्हणाल्या, ‘लोकसभा निवडणुकीत मला तिकीट मिळेल अशी आशा होती. मात्र ते न मिळाल्याने मी पक्ष सोडला, असे म्हणता येणार नाही. मी १० वर्षे काँग्रेसची नि:स्वार्थीपणे सेवा केली. आता मी विचार केल्यानंतरच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मी मुंबईकर असल्याने मला शिवसेनेबाबत पूर्वीपासून आत्मियता वाटत आली आहे, असे प्रियांका चतुर्वेदींनी स्पष्ट केले.

शिवसेनेला फक्त मुंबईतच नाही तर देशात मजबूत कराणार

शिवसेनेला फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण देशात जिथे मजबूत करण्याची जबाबदारी दिली जाईल ती पार पाडण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबई माझी कर्मभूमी आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करताना मी मुंबईपासून दुरावले होते. मला मुंबईत परतायचे होते आणि अशा स्थितीत शिवसेना हा सर्वोत्तम पर्याय होता. मी मूळची मुंबईकर असल्याने लहानपणापासूनच शिवसेनेबाबत आत्मियता आहे. त्यामुळे मला मनपरिवर्तन करण्याची गरज पडली नाही. मला शिवसेनेकडून कोणतीही अपेक्षा नाही. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे, असे त्यांनी सांगितले.

पुन्हा टीका होतील…

सोशल मीडियावर माझ्यावर पुन्हा टीका केली जाईल. मी भूतकाळात केलेली टीका बाहेर काढली जाईल, पण मी विचारपूर्वक शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे चतुर्वेदींनी म्हटले आहे. मी मथुरातून तिकीट मागितले नव्हते, मथुरा हे माझ्या आई – वडिलांचे गाव आहे. त्या शहराशी माझे भावनिक नाते आहे, असे त्या म्हणाल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like