हिंसाचारात अटक झालेल्या काँग्रेसच्या ‘त्या’ माजी नगरसेविकेला लग्नासाठी ‘जामीन’

दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली ईशान्य भागात झालेल्या हिंसाचारातील एका प्रकरणात संबंध असल्याचा ठपका ठेवत बेकायदेशी कृत्य प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून काँग्रेसच्या माजी नगरसेविका इशरत जहां यांना अटक करण्यात आली. इशरत जहां या काँग्रेसच्या दिल्लीतील माजी नगरसेविका असून त्यांना दिल्लीच्या न्यायालयाने लग्नासाठी दहा दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतील ईशान्य भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता. त्यातील एका प्रकरणात इशरत जहां यांचा संबंध असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे असून, त्यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी इशरत जहा यांना 1-1 लाखांच्या दोन जामिनावर 10 जून ते 19 जून पर्यंत सोडण्याचा निर्णय दिला आहे.

यावेळी न्यायालयाने इशरत जहां यांना या प्रकरणातील कोणत्याही पुराव्यांशी छेडछाड अथवा साक्षीदारांवर प्रभाव न पाडण्याचे म्हटले आहे. इशरत जहा यांच्या वतीने एस.के शर्मा आणि ललित वालिचा यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या अंतरिम जामीन याचिकेनुसार 2018 मध्ये इशरत जहां यांचा विवाह 12 जून 2020 रोजी निश्चित करण्यात आला होता. या प्रकरणात इशरत जहां यांनी चुकीच्या पद्धतीने गुंतवले असल्याचा दावा देखील याचिकेत करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे निराधार आणि खोटे असून, यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला देखील नुकसान झाल्याचे या जामीन याचिकेत म्हटले आहे.