खंडणीसाठी माजी नगरसेवकाला गोळ्या घालण्याची धमकी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेवकाला फोनवरून एक लाखांच्या खंडणीसाठी गोळ्या घालण्याची धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी (दि.1) समोर आला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईश्वर बापूराव ठोंबरे (58, रा. बजाज ऍटो कॉलनी, आकुर्डी) असे धमकी आलेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ठोंबरे हे बजाज ऑटो कंपनीत सध्या कार्यरत असून त्यांच्या पत्नी सुभद्रा ठोंबरे याही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. वाय. होळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठोंबरे यांना पाच दिवसात एक लाख रूपये खात्यावर जमा कर नाही तर मरशील, धनकुडे साहेबांची ऑर्डर आहे असा मॅसेज आला. तसेच खाते नंबर देऊन सोमनाथ भगवान जाधव याचे नावही देण्यात आले होते.

त्यानंतर पुन्हा त्याच नंबरवरून शिवीगाळ करत एक लाखांची खंडणीची मागणी करण्यात आली तसेच न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याच्या धमकीचा मॅसेज आला. यामुळे घाबरलेल्या ठोंबरे यांनी शुक्रवारी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.दरम्यान, आरोपीच्या मोबाईल नंबर पोलिसांनी ट्रॅक केला असता तो फलटण येथील दाखवत असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.