गौतम गंभीरची राजकीय इनिंग सुरु, भाजप पक्षात प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय टीमचा माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता त्याने भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपसाठी ही आनंदाची बातमी आहे. केंदीय मंत्री अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीरचा भाजप मध्ये प्रवेश झाला.

एएनआयने याबाबतची माहिती प्रसिद्ध केले आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर असलेला गौतम गंभीर आता राजकारणाच्या मैदानात बॅटींग करताना दिसणार आहे.

भाजप गौतम गंभीरला दिल्लीमधून लोकसभेची उमेदवारी देऊ शकते. गेल्या अनेक दिवसांपासून तो राजकारणात येणार अशी चर्चा होती. क्रिकेटर गौतम गंभीर यांच्यासह एक केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षाचे माजी खासदार आणि सध्याचे आमदार यांना उमेदवारी देण्याचा विचार भाजपकडून सुरु आहे. क्रिकेटर वीरेंद्र सेहवागला देखील भाजपकडून हरियाणाच्या रोहतकमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खासदार मीनाक्षी लेखी यांच्या जागी गौतम गंभीरला उमेदवारी मिळू शकते. आम आदमी पक्षावर ट्विटरच्या माध्यमातून नेहमी टीका करताना गंभीर दिसत होता. त्यामुळे भाजपने त्याला राजकारणात येण्याची संधी दिली असल्याचं बोललं जात आहे. काही आमदारांनी देखील नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी पक्षाच्या अध्यक्षांकडे केली होती. दिल्लीत २०१७ मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत याचा फायदा झाल्याचा देखील भाजपच्या नेत्यांनी म्हटलं होतं.