पिंपरीत माजी उपमहपौरांच्या मुलावर हल्ला ; वाहनांची तोडफोड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्या मुलावर रविवारी रात्री हल्ला करण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून हा हल्ला झाला असून त्यांच्या वाहनांची तोडफोडही करण्यात आली आहे.

याप्रकरणी अमित हिरानंद आसवानी (23, रा. शनिमंदिरासमोर पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर कृष्णा उर्फ बॉक्सर (रा. मिलिंदनगर, पिंपरी), व्यंकटेश नाईक, आदित्य साळवे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित हा माजी उपमहापौर डब्बू उर्फ हिरानंद आसवाणी यांचा मुलगा आहे. अमित रविवारी रात्री व्हॉलीबॉल खेळण्यासाठी पिंपरीतील शास्त्रीनगर येथे गेला होता. तेथून माघारी आल्यानंतर तो घराच्या गेटवर उभा असताना आरोपी हातात लोखंडी रॉड घेऊन त्या ठिकाणी आले. ‘आमच्या सचिन व सनी भाईच्या विरोधात तक्रार करतो का, तुम्हाला बघून घेतो, त्या डब्याला खल्लास करतो’ असे बोलून आरोपी गेटजवळ आले. यावेळी एकाने हातातील रॉड अमितच्या दिशेने भिरकावला. अमितने कसाबसा ‘रॉड’ हुकवून तेथून पळ काढला.

अमित पळून गेल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करीत गेटमधील वाहनांची तोडफोड केली. तसेच हातातील रॉडने गेटवरील लाकडी पट्ट्या तोडून नुकसान केले. यावेळी गोंधळ झाल्याने शेजारील नागरिक बाहेर आले. त्यांनी ‘काय झाले’ अशी विचारणा करताच आरोपींनी ‘समोर कोणी आल्यास जिवंत सोडणार नाही’ असा दम दिला. त्यामुळे भेदरलेल्या नागरिकांनी देखील दारे लावून घेतली. तपास पिंपरी पोलिस करत आहेत.