१९८४ मध्ये ‘दंगल’ नाही तर राजीव गांधींच्या आदेशानुसार ‘नरसंहार’

युपीच्या माजी महासांचालकांची वादग्रस्त पोस्ट

लखनऊ : वृत्तसंस्था – शिख दंगलीवरून राजीव गांधी यांचे सल्लागार सॅम पित्रोडा यांनी १९८४ च्या दंगलीसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर युपीचे माजी महासंचालक सुलखान सिंह यांनी आगीत तेल घालण्याचे काम केले आहे. सुलखान सिंह यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे.

यामध्ये त्यांनी, १९८४ मध्ये झालेली शिख दंगल ही दंगल नव्हती, तर राजीव गांधी यांच्या आदेशानुसार काही निवडक आणि विश्वासातील काँग्रेस नेत्यांनी स्वत: घडवून आणलेला नरसंहार होता.  यानंतर त्यांच्यावर होत असलेल्या टीकेनंतर त्यांनी ही वादग्रस्त पोस्ट फेसबूकवरून काढून टाकली.

१९८० च्या बॅचचे असलेले आयपीएस आणि उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक सुलखान सिंह यांनी हे वादग्रस्त लिखान केले आहे. पुढे ते म्हणतात, ३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी मी पंजाब मेलने लखनऊ येथून वाराणसी येथे जात होतो. रेल्वे अमेठी स्टेशनवर उभी होती.

त्याच वेळी एक व्यक्ती ट्रेनमध्ये चढला. त्याने सांगितले कि इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यानंतर वाराणसीपर्यंत कोणतीही विपरीत घटना घडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत वाराणसीत काहीही झाले नाही. यानंतर योजनाबद्ध पद्धतीने घटना घडल्या. जर जनतेमध्ये संताप असता तर लगेच दंगल पेटली असती.

सुलखान सिंह यांचा दावा आहे की, नियोजन करून नरसंहार सुरू करण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार कँग्रेसचे तत्कालीन नेते भगत, टायटलर, माकन आणि सज्जन कुमार हे मुख्य सुत्रधार होते. सुलखान सिंह यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्याता निर्माण झाली आहे. यावर आता काँग्रेस कसे उत्तर देते हे पाहावे लागेल.