माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांच्या कडक शिस्तीपेक्षा समोरच्याला प्रेमाच्या चार शब्दाने जिंकणारे आणि लहान मोठ्यांपासून सर्वांशी बोलताना देवा अशी सुरुवात करणारे माजी पोलीस महासंचालक व उत्तर प्रदेश राज्यपालाचे सल्लागार अरविंद इनामदार (वय ७९) यांचे आज पहाटे मुंबईतील रिलायन्स हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये निधन झाले. इनामदार यांच्या निधनाने माझे आई, देवा, राम राम माऊली अशा शब्दांना आता सर्व जण पोरके झाले आहेत. खळखळून हसत बोलणारे आणि वयाचा पडदा न ठेवणारे पोलीस दलातील हे वेगळे व्यक्तीमत्व आज पडद्याआड गेले.

अरविंद इनामदार हे १ ऑक्टोबर १९९७ ते ५ जानेवारी २००० या दरम्यान राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याच कार्यकाळात महाराष्ट्राला हदरवून टाकणारी जळगाव बलात्कार कांड झाले होते. या घटनेने ते खूप व्यस्थित झाले होते. अरविंद इनामदार यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर गावी झाला. नकळत्या वयात त्यांच्या आईने इनामदार यांना भगवतगीतेचे श्लोक पाठ करुन घेतले. लहानपणी झालेले हे संस्कार इनामदार यांनी आयुष्यभर जपले. पोलीस खात्यासारख्या रुक्ष खात्यात ते असतानाही त्यांनी साहित्याशी आपली जवळीक कायम ठेवली.

आयुष्यभर साहित्यिकांच्या वर्तुळात वावरणारे इनामदार हे कर्तृत्वाबाबतही तितकेच कठोर होते. वाचनाची त्यांना प्रचंड आवड होती. आईने लहानपणी दिलेल्या भगवतगीतेचा संदेश त्यांनी आयुष्यभर जपला. त्यामुळेच ते आईच्या निधनानंतर आई गेली पण गीताई आहे, असे सांगत असत. पोलीस खात्यात सर्वोच्च पदावर काम करतानाही वेळप्रसंगी त्यांनी शासनाच्या निर्णयाला विरोध करण्याचा ताठ कणाही दाखविताना त्यांनी एक वर्ष अगोदर आपला राजीनामा दिला.

Visit : Policenama.com