उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून जनतेची दिशाभूल, माजी ऊर्जामंत्र्यांची टीका

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  देशातील एकाच वेळी लाईट बंद केल्यास विजेची मागणी एकदम कमी होईल. लॉकडाऊनमुळे अधिच कंपन्या बंद असल्याने वीजनिर्मिती आणि मागणी याच गणित बिघडलं आहे. जर सर्वांना एकाच वेळी लाईट बंद केली तर परिस्थिती अजून बिकट होईल. एकाच वेळी अनेक लोकांनी लाईट बंद केल्यास ग्रीड हाय फ्रिक्वेन्सी निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा विधानांचा पुर्विचार व्हावा अशी प्रतिक्रिया ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधानांच्या आव्हानावर दिली होती. त्यावर आता माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर टीका करत ते जनतेची दिशाभूल करत असल्याचे म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, कमीजास्त वीजपुरवठ्याचे नियोजन करणे सहजशक्य आहे. तसेच ते नियोजन करण्यासाठी सरकारकडे पुरेसा वेळ आहे. नितीन राऊत यांनी पॉवर ग्रीड आणि वीजपुरवठा खंडित होण्याबाबत केलेले आवाहन हे दिशाभूल करणारे आहे. गेली पाच वर्षे मी ऊर्जामंत्री म्हणून काम पहात होतो. या काळात वीजेचा कमीजास्त पुरवठा करण्याचे प्रसंग अनेकदा आले. आपल्याकडील कोयना, घाटघर सारख्या वीजप्रकल्पात काही मिनिटांमध्ये वीजपुरवठा कमीजास्त करता येण्याची क्षमता आहे.

दरम्यान ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरातील लाईट बंद करण्याचे अपील केली आहे. परंतु विद्युत उपकरणे बंद करण्यास सांगितलेले नाही. तसेच यावेळी पथदिवे सुरु राहणार आहेत. जेणेकरून सामान्य नागरिकांना याचा कोणताही त्रास होणार नाही. पथदिवे सुरु ठेवण्याचे राज्य सरकारांना सूचना देण्यात आल्या आहेत.