जालना : अज्ञाताकडून गोळीबारात माजी ग्रामपंचायत सदस्य जागीच ठार, परिसरात प्रंचड खळबळ

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच एक धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथे अज्ञात इसमांनी केलेल्या भीषण गोळीबारात सेलगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय अंभोरे यांचा जागीच मृत्यू झाला. अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असले तरी हा गोळीबार कोणी आणि कशामुळे केला याबद्दल नेमकी माहिती मिळू शकली नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

अशी घडली घटना :
सेलगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय अंभोरे गावातल्या पान टपरीजवळ उभे असताना त्याच्या जवळ एक मोटरसायकल येऊन उभी राहिली. या मोटर सायकलवर हेल्मेट घातलेले दोन जण होते. हेल्मेटमुळे त्यांची ओळख होऊ शकली नाही. मोटारसायकलवरील या व्यक्तींनी अंबोरे यांच्या दिशेने गोळीबार केला. यात जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे असू शकते कारण :
मिळालेल्या माहितीनुसार अंभोरे यांच्यावर याआधीदेखील प्राणघातक हल्ला झाला होता. दरम्यान, अंभोरे हे जवळच्या एमआयडीसीमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर होते. येथे कारखान्यांना कामगार पुरवणाऱ्या अनेक गटांमध्ये आपापसात सातत्याने भांडणे आणि मारामाऱ्या होत असतात. यातूनच काही कारणाने हल्ला झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकरणाचा तपास वेगाने करणार असून पुढील तपासनंतरच हल्ल्याचं कारण कळू शकेल असं पोलिसांनी सांगितलं.

Visit : Policenama.com