गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला ‘कोरोना’ व्हायरसने संक्रमित

अहमदाबाद : वृत्तसंस्था – गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वाघेला यांचा कोरोना व्हायरस टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते होम क्वारंटाइन आहेत. वाघेला यांच्यात कोरोनाची हलकी लक्षणे आहेत. आता हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचे की, होम क्वारंटाइनमध्ये राहायचे, याबाबत त्यांना स्वत:ला निर्णय घ्यायचा आहे. गुजरातमध्ये शुक्रवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 580 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर एकुण प्रकरणांचा आकडा 30,000 च्या पुढे गेला आहे. तर संसर्गाने आणखी 18 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

यापूर्वी 21 जूनला एका दिवसात कोरोना संसर्गाची सर्वाधिक 580 नवी प्रकरणे समोर आली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटले की, मागील 24 तासात आलेल्या नव्या प्रकरणांसह संक्रमित लोकांची संख्या 30,158 झाली आहे. या कालावधीत संसर्गाने 18 रूग्णांचा मृत्यू झाला झाल्याने एकुण मृतांची संख्या 1772 झाली आहे. विभागानुसार विविध हॉस्पिटलमधून बर्‍या झालेल्या 532 रूग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 22,038 रूग्ण बरे झाल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात कोविड-19ची सध्या 6348 प्रकरणे आहेत. एकुण 3,51,179 लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

अहमदाबादमध्ये कोरोनाचा आकडा 20,000 च्या पुढे
गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यात मागील 24 तासात कोरोना व्हायरस संसर्गाची 219 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर एकुण संक्रमितांची संख्या शुक्रवारी 20,000 च्या पुढे गेली. राज्य आरोग्य विभागाने सांगितले की, जिल्ह्यात एकुण संक्रमितांची संख्या 20,058 झाली आहे. मागच्या 24 तासात 8 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यानंतर एकुण मृतांची संख्या 1,398 झाली आहे. मागच्या 24 तासात विविध हॉस्पिटलमधून 210 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.