बनावट नोटा छापल्या प्रकरणी हॉकी खेळाडूला अटक

भोपाळ : वृत्तसंस्था

बनावट नोटा छापल्याच्या आरोपावरून माजी राज्यस्तरीय हॉकी खेळाडूला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील ही घटना आहे. हॉकी खेळाडूवर बनावट नोटा छापल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दावा केली आहे की, चौकशीदरम्यान आरोपी हॉकी खेळाडूने भोपाळमधील एका व्यक्तीने विधानसभा निवडणुकीआधी तीन कोटींच्या नोटा छापण्याची ऑर्डर दिली होती असा खुलासा केला आहे. आफताब अली उर्फ मुश्ताक खान असं अटक झालेल्या खेळाडूचं नाव आहे.

९ ऑक्टोबरला राजगड जिल्ह्यातून अटक करण्यात आलेल्या पाच जणांच्या चौकशीनंतर ही अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान पाच जणांकडून ३१ लाख ५० हजार रोख रुपये जप्त करण्यात आले होते. यामध्ये सर्व ५०० आणि २००० च्या नोटा होत्या. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील एसपी सिमला प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळचे रहिवासी आफताब अली उर्फ मुश्ताक खान यांना १२ ऑक्टोबरला अटक करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B07CK51LT9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0a982566-d07e-11e8-a8e7-6d03b44e89a2′]
अटक करण्यात आलेल्या पाच जणांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी नोट मशीनमध्ये स्कॅन केली जात असे त्यानंतर कागदावर ती प्रिंट करत. नंतर कापून नोटांचे बंडल तयार करत बाजारात खपवण्याचा प्रयत्न करत. पोलिसांनी सांगितल्यानुसार, दोन हजार रुपयांच्या सर्व नोटांवरील सीरिअल नंबर सारखाच होता. तर ५०० रुपयांच्या नोटेवरील सीरिअल नंबर वेगळे होते. पोलीस सध्या बनावट नोटा छापण्यासाठी जेथून कागद मिळत होता त्या जागेची माहिती घेत आहे.

एसपी सिमला प्रसाद यांनी सांगितल्यानुसार, अटक करण्यात आलेल्यांची चौकशी केली असता त्यांनी आफताब आपल्यावर कामगिरी सोपवत असल्याची माहिती दिली. ही टोळी नोटा बाजारात नेऊन व्यवहारात आणत असत. आफताब एक राज्यस्तरीय खेळाडू होता. त्याने सात वेळा राष्ट्रीय स्तरावर मध्य प्रदेशचं नेतृत्व केलं आहे. सध्या तो रिअल एस्टेटचा व्यवसाय करत होता. दरम्यान पोलिसांना अद्याप ज्याने तीन कोटींच्या नोटा छापण्याची ऑर्डर दिली होती त्याचं नाव कळू शकलेलं नाही.