एवढी ‘दगदग’ होत असेल तर IPL खेळू नका : कपिल देव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने भविष्यात संघाला थेट मैदानात लँड करावे लागेल असे म्हटले होते. आता भारताचे माजी कर्णधार कपील देव यांनी देखील यावर भाष्य केले आहे. कपिल देव म्हणाले जर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील शेड्युल फार व्यग्र वाटत असेल किंवा दगदग होत असेल तर त्यांनी आयपीएल खेळू नये, असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

आयपीएल मध्ये तुम्ही देशासाठी खेळत नसता. त्यामुळे तुमची दगदग होत असेल तर, आयपीएलच्या काळात ब्रेक घेण्यास हरकत नाही. तुम्ही जेव्हा देशासाठी खेळत असता तेव्हा वेगळी भावना असते, असेही कपील म्हणाले.

जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा तुम्हला देशासाठी सर्वोत्तम कामगिरी हि करावीच लागते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड ही करता येत नाही. थकवा ही एक मानसिक अवस्था आहे. जेव्हा तुम्ही धावा करत नाही किंवा तुम्हाला विकेट मिळत नाही तेव्हा थकवा वाटतो. न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय खेळाडूंवर कोणत्याही प्रकारचा अति क्रिकेटचा ताण नसल्याचे कपील यांनी सांगितले.