पत्नी आणि आईच्या हत्येप्रकरणी भारताच्या ‘या’ माजी एथलीटला अमेरिकेत अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतासाठी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या माजी एथलीट इकबाल सिंगला पत्नी आणि आईच्या हत्येप्रकरणी अमेरिकेमध्ये अटक करण्यात आली आहे. मिडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. ‘द फिलाडेल्फिया इन्क्वायरर’ यांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याद्वारे सांगितले की, पेनसिल्व्हेनिया येथील डेलावेर काउंटी येथे राहणारे 62 वर्षाचे इकबाल सिंग याने रविवारी सकाळी पोलिसांना फोन करून आपला गुन्हा कबूल केला.

अहवालात म्हटले आहे की, जेव्हा पोलिस न्यूटाऊन टाऊनशिपमध्ये इकबालच्या निवासस्थानी पोहचले तेव्हा त्यांनी पाहिले की, तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि स्वत: लाही त्याने हानी पोहचवली होती. दोन महिलांचे मृतदेह घरातच पडले होते. त्यात म्हटले आहे की, इकबालवर सोमवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीच्या प्रकृतिकडे पाहता, त्याला जामीन मिळाला नाही, तसेच स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणत्याही वकिलाची मदत घेतलेली नाही.

इकबाल हा एक गोळा फेक एथलीट होता आणि त्याने 1983 मध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई एथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. त्याच्या खेळण्याच्या कारकीर्दीतील ही सर्वात मोठी कामगिरी होती. यानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. अमेरिकन मीडियाच्या वृत्तानुसार, तो टॅक्सी कॅब ड्रायव्हर म्हणून काम करत होता. एनबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, इकबाल याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, जेथे तो पोलिस कोठडीत आहे.