इंदिरा गांधींना अटक करणार्‍या माजी IPS अधिकार्‍याला ‘सायबर’ भामट्यांनी ‘फसवलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटक करणाऱ्या माजी आयपीएस अधिकाऱ्याला सायबर क्राईमचा सामना करावा लागला आहे. एन. के. सिंह असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे असे सांगून काही भामट्यांनी त्यांच्या खात्याची माहिती घेतली आणि 1.75 लाख रुपये चोरले आहेत. खात्यातील व्यवहाराबद्दल संशय आल्याने एसबीआय बँकेने लगेच अधिकाऱ्यांना कॉल केला आणि याबाबत माहिती दिली.

सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते खाते आता बंद केले आहे आणि पूर्व दिल्लीच्या न्यू अशोक नगरमधील पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

काय झाले होते नेमके –

28 नोव्हेंबर रोजी एन.के. सिंह यांना एक कॉल आला. प्रवीण कुमार नाव सांगत आपण एसबीआयमधून बोलत असल्याचे म्हंटले. तसेच तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगितले. त्यामुळे तुम्हाला काही माहिती द्यावी लागेल असे म्हंटले त्यानंतर सिंह यांनी माहिती द्यायला सुरुवात केली. मात्र नंतर त्यांना शंका येताच त्यांनी बोलण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली.

यावेळी त्यांना खऱ्या एसबीआयमधून कॉल आला आणि बँक खात्यात काही व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले. एकूण तीन व्यवहार करून खात्यातून 1.75 लाख रुपये काढून घेण्यात आले. सिंह यांनी लगेच खाते बंद करून टाकले.

याबाबतच्या अधिक तपासासाठी पोलिसांनी अनेक टीम राज्याच्या बाहेर देखील पाठवल्या आहेत. एन.के. सिंह 1961 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. 1996 साली त्यांनी निवृत्ती स्वीकारली. 1977 मध्ये सिंह यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटक केली होती.

Visit : policenama.com