41 दिवसानंतर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले – ‘या’ कारणामुळं सरकार वाचवू शकलो नाही

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यांनतर कमलनाथ सरकार कोसळलं होत. बहुमत नसल्यानं कमलनाथ यांनी २० मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु या सर्व राजकीय घडामोडीनंतर कमलनाथ यांनी सरकार वाचवण्यात अपयश का आलं याबाबत ४१ दिवसांनी भाष्य केलं आहे.

कमलनाथ यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, काही आमदारांसोबत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचं दिवसातून तीन वेळा बोलणं व्हायचं. काही आमदारांनी आम्हाला माघारी येणार असल्याचे देखील बोलले होते. आमदारांनी आम्हास विश्वास दाखवला होता. त्यामुळे आम्ही निर्धास्त होऊन त्यांच्यावरती अवलंबून राहिलो. त्या आमदारांवरती आंधळा विश्वास ठेवल्यानंच आम्हाला सरकार वाचवता आलं नाही, असा खुलासा कमलनाथ यांनी केला.

जुलै पासून ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या संपर्कात होते

२०१९ ला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपच्या संपर्कात होते. तसंच लोकसभेत एक लाखांहून अधिक मतांनी झालेला पराभव त्यांना पचवता आला नसल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला असल्याचे कमलनाथ यांनी यावेळी सांगितले.

पोटनिवडणुकीत काँग्रेस १५ पेक्षा जास्त जागा जिंकेल

मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीबाबत कमलनाथ यांनी अनेक दावे यावेळी केले आहे. त्यांनी म्हटलं की, हा आकडेवारीचा खेळ असून सध्या आमच्याकडे ९२ आमदार आहे आणि भाजपाकडे १०७ आमदार आहेत. २४ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. यात किमान १५ जागा आम्ही जिंकू असा ठाम विश्वास कमलनाथ यांनी व्यक्त केला.