‘आयटम’ वक्तव्यावरून राहुल गांधींनी कमलनाथ यांना फटकारलं, म्हणाले – ‘अशी भाषा चालणार नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ ( Kamalnath) यांनी भाजपच्या उमेदवार इमरती देवी (Imarti Devi) यांचा ‘आयटम’( Item) असा उल्लेख केला होता. त्यावरून राजकारण तापलं असून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी मंगळवारी चांगलच फटकारलं. राहुल गांधी यांनी त्यांना ही समज दिली. राहुल हे सध्या आपला मतदारसंघ असलेल्या वायनाडच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात विचारलेल्या एका प्रश्नावर कमलनाथ यांच्याबद्दल राहुल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी कमलनाथ हे काँग्रेस पक्षाचे आहेत, मात्र अशा प्रकारची भाषा योग्य नाही. कुठल्याही नेत्याला अशी भाषा वापरणं हे चांगलं नाही. मला अशी भाषा वापरणे हे मुळीच आवडलेलं नाही. असं वक्तव्य हे दुर्दैवी आहे, असे म्हटले.

कमलनाथ यांच्या या वक्तव्यावरून भाजप उमेदवार इमरती देवी यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली आहे. कमलनाथ हे तर कलंकनाथ आहेत. मी त्यांना राक्षस समजते अशी टीका त्यांनी केली. एका प्रसार सभेत कलमनाथ यांनी ‘आयटम’ असा उल्लेख केल्याने मध्य प्रदेशात वादळ निर्माण झालं होतं. याचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला असून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chauhan) यांनी मौन आंदोलन करत याचा निषेध केला आहे. याविषयी कमलनाथ यांच्यावर टीका करताना इमरती देवी म्हणाल्या, कधी काळी कमलनाथ यांना मी मोठा भाऊ मानत होती. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी माझा अपमान केला होता. ते मुख्यमंत्री असताना आम्ही भेटायला गेल्यानंतर ते सगळ्यांना फटकारत असतं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत काहीही विकास केला नाही. मुख्यमंत्री पद गेल्याने कमलनाथ यांना वेड लागलं असून ते राज्यभर फिरत आहेत, अशी घणाघाती टीका देखील त्यांनी केली आहे.

कमलनाथ काय म्हणाले होते ?
कमलनाथ यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका व्हायला लागल्यानंतर त्यांनी एका जाहीर सभेत याचे स्पष्टीकरण दिले होते. मी कोणाचा अपमान केला नाही. मी नाव विसरलो होतो. मात्र शिवराज सिंह चौहान निमित्त शोधत आहे. पण कमलनाथ कधी कोणाचा अपमान करीत नाही. त्यामुळे आता निवडणुकीत कमलनाथ यांच्या या विधानाचा काँग्रेसला (Congress) किती फटका बसतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.