महाराष्ट्राच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यास ‘कोरोना’ची लागण, पुण्यात हलवणार

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यात आणखी एका महारष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय-89) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना पुढील उपचारासाठी निलंगा येथून पुण्यात हलवण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. याआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून निलंगेकरांना प्रकृतीचा त्रास जाणवत होता. 14 तारखेला शिवाजीरावांना ताप आणि सर्दीचा त्रास सुरु झाला. त्यांनंतर निलंग्यातील डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना लातूरला हलवण्यात आलं. तिथं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, तिथे त्यांची कोरोना चाचणी करून घेण्यात आली होती. त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचा स्वभाव लढवय्या आहे. ते या आजारावर मात करून ठणठणीत बरे होती, असा विश्वास माजी मंत्री व निलंगेकरांचे नातू संभाजी पाटील-निलंगेकर यांनी म्हटले आहे.

शिवाजीराव पाटील हे लोकांमध्ये वावरणारे नेते आहेत. अनेक कार्यकर्त्यांचा त्यांच्याकडे राबता असतो मात्र, कोरोना काळात ते घरातच होते. वयोमानामुळे कुटुंबीयांकडून त्यांची काळजीही घेतली जात होती. तरी देखील त्यांना कोरोना झाला असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

याआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अशोक चव्हाण यांना उपचारासाठी नांदेड येथून मुंबईला हलवण्यात आलं होतं. उपचार घेतल्यानंतर काही दिवसांतच अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली होती. राज्य सरकारच्या मंत्री मंडळातील धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.