माजी महापौर संदीप कोतकरला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन- सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप कोतकर याला सोमवारी रात्री ‘सीआयडी’ने केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने नगर येथील न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात खुनाच्या कटात संदीप कोतकर याचा सहभाग असल्याचे प्राथमिक दोषारोपपत्रात नमूद केलेले आहे. संदीप कोतकर व माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्यात मोबाईलवरून चर्चा केली होती. संदीप याच्या सांगण्यावरूनच संदीप गुंजाळ उर्फ डोळश्या याला सुवर्णा कोतकरने मयत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्याकडे जाण्यास सांगितले होते. त्यानंतरच हत्याकांड झाले.

हत्याकांडाच्या दिवशी संदीप कोतकर हा दिवसभर कारागृहाबाहेर होता. त्याचे मोबाईलवरून पत्नी सुवर्णा कोतकर हिच्यासोबत अनेकदा बोलणे झाले होते. त्यामुळे ‘सीआयडी’ने गुन्ह्याच्या कटात संदीप कोतकर याचा सहभाग असल्याचे दोषारोपपत्रात नमूद केलेले होते. संदीप कोतकर हा सध्या नाशिक कारागृहात अशोक लांडे खून प्रकरणाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याचा गुन्ह्यात सहभाग असूनही त्याला सीआयडीकडून वर्ग करून घेतले जात नव्हते. अखेर आज रात्री त्याला वर्ग करून घेत सीआयडीच्या पुणे कार्यालयातील पोलीस उपाधीक्षक अरुणकुमार सपकाळ यांनी अटकेची कार्यवाही पूर्ण केली.

माजी महापौर संदीप कोतकर हा भाजपचे आ. शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. त्यांची पत्नी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर ही हत्याकांडातील मुख्य आरोपी असून ती सध्या फरार आहे.