‘शिंदे यांचा घसा दुखतोय म्हणून ते बोलणार नाहीत, हे कळल्यावर मी घाबरलोच’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगरमध्ये आज पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी माजी मंत्री. प्रा राम शिंदे यांनी घसा दुखत असल्याचे कारण देत बोलणे टाळले. त्यानंतर तोच धागा पकडत ‘शिंदे यांचा घसा दुखतोय म्हणून ते बोलणार नाहीत, हे कळल्यावर मी घाबरलोच. कारण कोरोनाचे एक लक्षण घसा दुखणे आहे,’ असे म्हणत माजी मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या भाषणात फटकेबाजी केली. दरम्यान, त्यांच्या वक्तव्यानंतर एकच हशा पसरला.

नगरमधील सावेडी येथे आज शहर भाजपच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सूत्रसंचालकाने प्रा. राम शिंदे यांना बोलण्यासाठी आमंत्रित केले होते. तेव्हा भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी सांगितले की, ‘शिंदे साहेबांचा घसा दुखत असल्याने ते बोलणार नाहीत.’ जेव्हा तावडे तावडे हे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी सर्वात प्रथम बोलताना म्हटले की, ‘जेव्हा भैय्या गंधे यांनी म्हटलं की शिंदे हे घसा दुखत असल्याने बोलणार नाही, तेव्हा मी घाबरलो. कारण कोरोनाचे एक लक्ष घसा दुखणे आहे. मी त्यांना लगेच विचारले, काय रे बाबा काय झाले, त्यावर रामभाऊ म्हणाले, संघचालक बोलल्यानंतर दुसरे कोणी बोलू नये, म्हणून मी बोललो नाही. त्यानंतर मात्र मी निर्धास्त झालो. नाहीतर जाता जाता कुठेतरी रुबी हॉल किंवा मंगेशकर रुग्णालयात मला जावे लागले असते.’

प्रांत संघचालकांचे मानले आभार
माजी मंत्री विनोद तावडे यांनी शहर भाजपच्या कार्यक्रमास प्रांत संघचालक नानासाहेब जाधव उपस्थित राहिल्याने त्यांचे विशेष आभार मानले. ‘भाजपच्या मंचावर कोणतेही संघचालक येत नाहीत. पण दीनदयाळ यांची आज जयंती आहे, त्यांच्या एकात्म, मानवता या विचारांच्या मार्गाने संघ परिवार जातो. त्यामुळे आजच्या कार्यक्रमास नानासाहेब आले, याचा मनापासून आमच्या सर्वाना आनंद झाला.’ असे तावडे म्हणाले. या कार्यक्रमास माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह प्रा. राम शिंदे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी खासदार दिलीप गांधी आदी उपस्थित होते.