माजी मंत्री आणि देशातील सर्वात वयोवृद्ध लेखक बी. जे. खताळ यांचे निधन

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी मंत्री आणि देशातील सर्वात वयोवृद्ध लेखक बी. जे. खताळ यांचे सोमवारी पहाटे सव्वा दोन वाजता राहत्या घरी निधन झाले.

संयुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी १९५७ मध्ये निवडणूक लढविण्यास नकार देणारे आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६२ मध्ये संगमनेर या कम्युनिष्टांच्या बालेकिल्ल्यातून ते निवडुन आले होते. राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी वयाच्या ९३ वर्षी लिहायला सुरुवात करत पुढील आठ नऊ वर्षात सात पुस्तके लिहिली. वाळ्याची शाळा हे पुस्तक वयाच्या १०१ व्या वर्षी लिहून देशातील सर्वात वयोवृद्ध लेखक म्हणून एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता.

राज्याच्या राजकारण, सहकार , शेती, शिक्षण, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेल्या खताळ पाटील यांचा जन्म १६ मार्च १९१९ रोजी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे झाला होता. त्यांनी १९५२ मध्ये कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमधून काँग्रेस पक्षाकडून निवडणुक लढविली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर १९५७ मध्ये त्यांनी निवडणुक लढविण्यास नकार दिला. १९५८ मध्ये त्यांनी संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्यांच्या उभारणीस मुख्य प्रवर्तक म्हणून सुरुवात केली. १९६९ मध्ये प्रत्यक्षात कारखाना सुरु झाला.

त्यांनी यशवंतराव चव्हाण, दादासाहेब कन्नमवार, वसंतराव नाईक, ए आर अंतुले, बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रीमंडळात पाटबंधारे, कृषी, नियोजन, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, विधी व न्याय, प्रसिद्धी व माहिती, परिवहन अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम केले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून स्वत:हून निवृत्ती घेतली होती.