माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे हृदयविकाराने निधन, पुण्यातील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे माजी पाणी पुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे (वय, ५८) यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. आज मंगळवारी सकाळी पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पश्चात पती माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, मुलगा अभिजित, सून शारोन, २ मुली क्रांती आवळे आणि कोमल साळुंखे तसेच जावई अब्राहम आवळे, अजय साळुंखे आणि नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे ह्या सावली वूमेन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा होत्या. तर शाहू शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शक होत्या. संस्थेच्या कामकाजावर त्यांनी लक्ष ठेवून ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले आहे. सावली फाउंडेशनद्वारे स्त्रियांवरील सांसारिक ताण-तणाव कमी करावा यासाठी विविध उपक्रम राबवण्यात त्या पुढे होत्या. महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी त्यांनी अधिक प्रयत्न केले आहे.