माजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्यांचा पदभार यशस्वीपणे सांभाळणारे माजी मंत्री प्रा. जावेद खान (वय 77) यांचे शनिवारी (दि. 31) मुंबईत ( Former minister of Maharashtra Javed Khan passes away ) निधन झाले. जावेद खान यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मावळली. मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते निजामुद्दीन राईन यांनी याबाबत माहिती दिली. जावेद खान यांच्या पार्थिवावर जुहू येथील मुस्लीम मजलिस कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान जावेद खान यांच्या निधनाबद्दल काँग्रेस पक्षातून तीव्र शोक व्यक्त होत आहे. राज्याचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस जाकीर अहमद, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ता निजामुद्दीन राईन यांनी जावेद खान यांना श्रद्धांजली वाहिली.

जावेद खान हे मुंबईत इंग्रजीचे प्राध्यापक होते. पुढे राजकारणात पाऊल ठेवत त्यांनी यशही संपादन केले. 1985 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत पोहचले. त्यानंतर 1990 मध्ये सलग दुसऱ्यांदा त्यांनी विजय मिळवला. मुख्यमंत्री शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्यासोबत त्यांनी काम केले. आधी शिक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली आणि नंतर कॅबिनेटपदी बढती देत गृहनिर्माण आणि कामगार मंत्रालयाची धुरा त्यांच्याकडे सोपवली होती. शरद पवार यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केल्यानंतर जावेद खान यांनीही काँग्रेसला रामराम ठोकला होता. ते पवार यांच्या पक्षात सामील झाले. राष्ट्रवादीची स्थापना झाली त्याचवर्षी 1999 मध्ये जावेद खान यांना सिडको चेअरमनपदी संधी मिळाली होती. त्यानंतर 2012 मध्ये ते कृपाशंकर सिंह यांच्या आग्रहावरून पुन्हा काँग्रेसमध्ये परतले होते. जावेद खान हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. खान हे मूळचे उत्तर प्रदेशातील होते. जौनपूर जिल्ह्यात शाहगंज तहसील क्षेत्रात कमाल हे त्यांचे गाव होते.

You might also like