Pune : डॉक्टर सुनेचा छळ केल्याप्रकरणी पुण्यात माजी राज्यमंत्र्याविरोधात FIR

पुणेः पोलीसनामा ऑनलाइन – मुलाच्या अनैतिक संबंधांचा जाब विचारणाऱ्या डॉक्टर सुनेचा छळ केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी स्नेहा अभिजित शिवरकर (वय 37) यांनी वानवडी पोलिसात तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून त्यांचे पती अभिजीत बाळासाहेब शिवरकर (वय 38) सासरे बाळासाहेब विठ्ठलराव शिवरकर (वय 69), सासू कविता शिवरकर (वय 66), नणंद सोनाली सिद्धार्थ परदेशी (वय 40 सर्व रा. वानवडी, पुणे ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वानवडी पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा शिवरकर या पेशाने डॉक्टर असून त्यांना डायबेटिस आहे. स्नेहा यांचे नोव्हेंबर 2009 मध्ये अभिजित शिवरकर यांच्यासोबत लग्न झाले होते. तेंव्हापासून घरात पती, सासू व नणंद यांनी किरकोळ गोष्टीवरून त्यांना शिवीगाळ व मारहाण करत असत. आम्हाला डायबेटिक सून नको असे ते म्हणत. तसेच पती अभिजीतचे बाहेर अनैतिक संबध असल्याचे स्नेहा यांना समजले होते. त्याबद्दल स्नेहा जाब विचारत असल्याने सासरच्यांना राग येत असे. त्या रागातून स्नेहा यांचा शारीरिक अन् मानसिक छळ केला जात असे. आमचे कुटुंब प्रतिष्ठित असून बाहेर कोठेही काही बोलू नको, असे म्हणत वारंवार शिवीगाळ, मारहाण करत असत असे स्नेहाने तक्रारीत म्हटल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक भूषण पोटवडे करीत आहेत.