गुजरातचे माजी गृह राज्यमंत्री विपुल चौधरी यांना अटक, डेअरी घोटाळा केल्याचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातचे माजी गृह राज्यमंत्री विपुल चौधरी यांना रविवारी सकाळी गांधीनगर येथील त्यांच्या निवासस्थानावरून गुजरात पोलिसांनी अटक केली. गुजरात पोलिसांच्या सीआयडी क्राइमने विपुल चौधरी यांना त्यांच्या घरातून पकडले.

14.80 कोटींच्या डेअरी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी विपुल चौधरी यांच्याविरूद्ध ही कारवाई केली आहे. CID क्राइमनुसार, या प्रकरणात दूध सागर डेअरीतील 1932 कर्मचार्‍यांना बँक खात्यांद्वारे बोनस देण्यात आला. परंतु नंतर त्यांच्याकडून 14.80 कोटी रुपये काढून घेण्यात आले. विपुल चौधरी यांना 9 कोटी रुपये विशिष्ट कालावधीत परत करण्याचे आदेश न्यायाधिकरणाने दिले होते.

सीआयडीच्या म्हणण्यानुसार, चौधरी यांना 22 कोटी रुपयांपैकी 40 टक्के परत करण्यास सांगितले होते, कारण डेअरीला 22 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाशी (GCMMF) सल्लामसलत न करता जनावरांसाठी चारा महाराष्ट्रात पाठविला गेला.

मध्यंतरी विपुल चौधरी यांनी असा दावा केला आहे की दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात जनावरे पाठविणे घोटाळा म्हणता येणार नाही. चौधरी यांनी 40 टक्के रक्कम परत केल्याचा दावाही केला. आपल्या जागेच्या आधारे कर्ज घेऊन त्याने ही रक्कम परत केल्याचा त्यांचा दावा आहे.

विपुल चौधरी यांची ही अटक मेहसाणा दूधसागर डेअरी निवडणुकीच्या एका आठवड्यापूर्वी झाली होती. पुढील वर्षी 5 जानेवारी रोजी ही निवडणूक होणार आहे.