पुरंदरमध्ये माजी आमदार अशोकराव टेकवडे सक्रीय झाल्याने राष्ट्रवादीत नवचैतन्य

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाईन – पुरंदरचे माजी आमदार अशोकराव टेकवडे यांची शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे अशोकराव टेकवडे हे शनिवार ( दि.३०) पासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय झाल्याने राष्ट्रवादीत नवचैतन्य निर्माण झाल्याचे पहावयास मिळू लागले आहे.

पुरंदरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे जिल्हा परिषद निवडणुकीपासून काही तांत्रिक बाबींमुळे पक्षापासून अलिप्त होते. त्यामुळे बारामती लोकसभेच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारामध्ये अशोक टेकवडे सक्रीय होणार कि नाही , राष्ट्रवादीला पुरंदर मध्ये मताधिक्य मिळणार कि नाही याबाबत पुरंदरमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधान आले होते. मात्र शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी आमदार अशोक टेकवडे यांच्याशी सासवड येथे निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली. त्यामुळे अशोकराव टेकवडे यांनी आज शनिवार ( दि. ३० ) पासून पुरंदर मधील बोपगाव, चांबळी, हिवरे आदी गावात मतदारांच्या गाठी भेटी घेऊन पक्षाचा जाहीरनाम्याचे वाटप केले. यावेळी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, शामकांत भिंताडे तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी आमदार अशोकराव टेकवडे हे राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सक्रीय होऊन गावोगावी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन कोपरा सभा घेत असल्याने कार्यकर्त्यामध्येही उत्साह वाढला आहे. त्यामुळे पुरंदर मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार कार्यकर्ते जोमाने करू लागले आहे.

यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे म्हणाले कि, खासदार सुप्रिया सुळे यांनी देशामध्ये बारामती मतदार संघात उत्कृष्ट काम केले असल्याने सुप्रिया ताईचा विजय निश्चित आहे . आम्ही सर्व कार्यकर्ते पुरंदरमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहोत.