माजी आमदार दिलीप मोहितेंना उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

खेड (राजगुरुनगर) : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा क्रांती मोर्चाला चाकण येथे हिंसक वळण लागले होते. याप्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाने (SIT) सुरु केला आहे. चाकण हिंसाचार प्रकरणी ठपका ठेवलेले आणि या प्रकरणात गुन्हे दाखल झालेले खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

मराठा क्रांती मोर्चास चाकण येथे हिंसक वळण लागले होते. याप्रकरणात माजी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता. माजी आमदार दिलीप मोहिते यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. न्यायाधीश रेवती ढेरे यांच्या न्यायालयात याबाबत दिलीप मोहिते यांचे वकील अ‍ॅड. मनोज मोहिते व अ‍ॅड. तपन थत्ते यांनी युक्तीवाद केला.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलीप मोहिते यांचा जामीन अर्ज मंजूर केला असून त्यांना १ आणि २ ऑगस्टला पोलीस ठाण्यात जबाब देण्याचे सांगण्यात आले आहे. पुढील सुनावणी २१ ऑगस्टला होणार असल्याचे मोहिते यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करून दिलीप मोहिते पाटील यांना दिलासा दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त