माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना ‘एवढया’ दिवसाची पोलिस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी मंगळवारी अटक (Arrest) केली. बुधवारी (दि.16) त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावर 18 डिसेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.

न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना हर्षवर्धन जाधव म्हणाले की, आपल्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अटक राजकीय हेतूने आहे. माझी सहकारी इशा झा हिच्यासोबत पुण्यातील बावधन भागातील एका दुकानात गेलो होतो, तेव्हा फिर्यादीने दोघांचे अपहरण आणि मारहाण केली. हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी पोलीस आपली तक्रारच घेत नव्हते असा आरोप देखील केला. याशिवाय मारहाणीची घटना सोमवारी घडलेली असताना मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल झाला असं सांगत यामागे राजकीय हात असल्याचा दावा त्यांनी केला.

काय आहे प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा सोमवारी सकाळच्या सुमारास आई, वडिलांना दुचाकीवरुन ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. याचवेळी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा हे रस्त्याच्या बाजूला एक चारचाकीमध्ये बसले होते. कारचा दरवाजा घडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यानंतर चड्डा यांनी गाडीत बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना जाब विचारला. त्यावर जाधव आणि इशा झा यांनी चड्डा आणि त्यांच्या वडिलांना मारहाण केली. त्यावेळी चड्डा यांनी वडिलांच्या हृदयाचे ऑपरेशन झाल्याचं सांगितलं. मात्र तरीही दोघांनी मारहाण करणं चालूच ठेवलं. यानंतर अमन चड्डा यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार मंगळवारी हर्षवर्धन जाधव यांना अटक करुन सकाळी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले.