धावत्या कारमध्ये तरुणीचा विनयभंग, माजी आमदाराविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपमध्ये प्रवेश केलेले मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे यांनी चालू गाडीमध्ये एका १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.  या तरुणीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शनिवारी हा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पीडितेच्या कुटुंब मंगेश सांगळे यांच्या ओळखीचे आहे.

काय आहे प्रकरण –

मंगेश सांगळे यांनी धावत्या कारमध्ये माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. मी मंगेश सांगळे यांना घरी सोडा अन्यथा आरडाओरडा करेन, अशी धमकी दिल्यानंतर मंगेश सांगळे यांनी मला घरी सोडले,  असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.  गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही घटना घडली होती.  मात्र या प्रकारामुळे तरुणी घाबरल्याने तसेच त्या कालावधीत परीक्षा असल्याने तिने सांगळे विरोधात तक्रार केली नव्हती. मात्र शनिवारी या तरुणीने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  त्यानुसार मंगेश सांगळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांनी सांगितले.

अटकपूर्व जामीन मंजूर –

दरम्यान, याप्रकरणी मंगेश सांगळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केला असता न्यायालयाने येत्या २८ मार्चपर्यंत त्यांना तात्पुरता जामीन दिला आहे.  आता २८ मार्च रोजी पोलीस न्यायालयात बाजू मांडतील आणि त्यानंतर मंगेश सांगळे यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत पुढील निर्णय होणार आहे.

मंगेश सांगळे हे मनसेच्या तिकिटावर विक्रोळीतून आमदार म्हणून निवडून आले होते. २०१४ मधील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी मनसेमधून भाजपात प्रवेश केला होता.