Pune News : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर मारहाणीचा आरोप, कोथरुड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   रसवंती गृह चालवणाऱ्या महिलेला भाजपच्या कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मारहाण केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी तक्रारदार महिला आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 19) कोथरूड पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पौडरोडवरील रामबाग कॉलनीतील गणेशकुंज सोसायटीबाहेर मनिषा संतोष भोसले ही तक्रारदार महिला गेल्या काही दिवसांपासून फिरत्या रसवंती गृहाची गाडी लावते. त्या कारणावरून सोसायटीतील रहिवाशी जयेश कुलकर्णी यांचा व तक्रारदार महिला आणि तिचा पतीसोबत वाद झाला होता. त्यावेळी मारहाण झाल्याने संबंधित महिलेने कोथरूड पोलिसात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांनी दोघांनाही समज देऊन हे प्रकरण मिटवले होते. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा कुलकर्णी आणि मनिषा भोसले यांच्यामध्ये वाद झाला. यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी त्याठिकाणी उपस्थित होत्या. त्यांनी भोसलेंना जयेश कुलकर्णी यांची माफी मागण्यास सांगून धक्काबुक्की केल्याचा आरोप केला जात आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून मेधा कुलकर्णी व अनिता तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी कोथरुड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. दरम्यान माजी आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, जयेश कुलकर्णी यांच्या सोसायटीबाहेर रसवंती गृहाच्या गाडीमुळे कचरा, घाण होऊन डासांचे प्रमाण वाढत आहे. कुलकर्णी यांची मुलगी अपंग आहे. या घाणीमुळे डास झाल्याने त्या मुलीला दोन वेळा डेंग्यू झाल्याने ही गाडी काढावी यासाठी महापालिकेकडे तक्रार केली होती.