पोलीसनामा इम्पॅक्ट : अखेर माजी आमदार ‘रमेश थोरात’ यांच्या फेसबुक पेजवरून पक्षप्रवेशाची ‘ती’ पोस्ट डिलीट

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील दापोडी येथे कुल गटातील (रासप) कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये झालेला प्रवेश आणि राष्ट्रवादी च्या दिग्गज नेत्यांनीही या गावपातळीवरील प्रवेशाला दिलेले अनन्य साधारण महत्व यामुळे हे प्रकरण गाजत असतानाच अचानक २४ तासांमध्येच पुन्हा त्या कार्यकर्त्यांची कुल गटात झालेल्या घर वापसीमुळे हे प्रकरण चविष्ट होत गेले आणि या प्रकरणाची ‛पोलीसनामा’ ने दखल घेतल्यानंतर हे प्रकरण संपूर्ण तालुक्यात मोठ्या चर्चेचा विषय बनले.

 

राष्ट्रवादी काँग्रेसने गावपातळीवरील पक्ष प्रवेशाला अनन्य साधारण महत्व देत थेट माजी आमदारांच्या फेसबुक पेजवरून त्याला प्रसिद्धी देऊन तो प्रतिष्ठेचा विषय केल्याने या प्रकरणाची व्याप्ती अजूनच वाढत गेली. आणि शेवटी ज्याची भीती होती तेच झाले. त्या पक्ष प्रवेशाचा बुमरँग उलटून त्यांच्याच दिशेने आल्याने त्याची झळ आता राष्ट्रवादीच्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या कार्यकर्त्यांना सहन करावी लागत आहे.

कारण रासप मधून राष्ट्रवादी आणि २४ तासांत पुन्हा राष्ट्रवादी व्हाया रासप असा त्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या पक्ष प्रवेशाच्या प्रवासामुळे सोशल मीडियावर कुल गटावर तुटून पडलेल्या थोरात गटातील कार्यकर्त्यांची आता मात्र कुल गटातील कार्यकर्ते चांगलीच फिरकी घेताना दिसत आहेत.
कारण ज्या दिवशी तो पक्ष प्रवेश झाला त्यानंतर दि. ७ सप्टेंबर रोजी तालुक्याचे माजी आमदार थोरात यांच्या ‛रमेश थोरात’ या फेसबुक पेजवर दापोडी ग्रामपंचायतीचे मा.सदस्य व दापोडी वि.का.सोसायटीचे मा.चेअरमन आदरणीय बबनभाऊ खोडवे यांचा ‛रासप’ मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समर्थकांसह जाहीर प्रवेश असा मजकूर व फोटो असणारी पोस्ट टाकण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या ऍक्टिव्ह टीमने कुल गटाला हिनवायला सुरुवात केली होती आणि २४ तासांतच त्या पक्षप्रवेशाचा फज्जा उडाल्याने अखेर ती पक्ष प्रवेशाची मोठ्या दिमाखामध्ये फोटोसह करण्यात आलेली पोस्ट पोलीसनामा मध्ये आलेल्या बातमी नंतर अखेर ९ सप्टेंबरला डिलीट करण्यात आली आहे. त्यामुळे त्या पेजवर ५ सप्टेंबर नंतर ७ सप्टेंबर ऐवजी आता ८ सप्टेंबरला टाकलेल्या पोस्ट दिसत आहेत.

कुल गटातील कार्यकर्ते मात्र आता हळूच चिमटा काढत ते पेज कोण चालवत आहे रे, असे म्हणताच सोशल मीडियावर कायम आघाडीवर असणारे काही कार्यकर्ते मात्र आपण ते पेज चालवत नाही बाबा, आपल्याला काही माहीत नाही बुआ असे म्हणून आपली जबाबदारी झटकत हात वर करत आहेत. तर कुल गटातील कार्यकर्ते मात्र या पक्ष प्रवेशातील घडलेल्या नाट्यमय घडामोडींचा मोठ्या चवीने आस्वाद घेताना दिसत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –