माजी आ. शंकरराव गडाख पोलिसांना शरण

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाइन – माजी आमदार शंकरराव गडाख हे आज दुपारी पोलिसांना शरण आले आहेत. त्यांच्याविरुद्ध पकड वॉरंट असल्याने स्थानिक गुन्हे शाखेत ते हजर झाले आहेत. काल पोलिसांनी अटकेसाठी त्यांच्या घराची झडती घेतली होती.

नगर-औरंगाबाद रस्त्यावर चक्काजाम आंदोलन प्रकरणात शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात माजी आमदार शंकरराव गडाख, अशोक गायकवाड आदी कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन कामकाजासाठी सदर खटल्याचे कामकाज नेवासा येथील न्यायालयासमोर सुरू आहे. न्यायालयाने समन्स वॉरंट जारी करूनही माजी आमदार गडाख हे हजर राहिले नाही. त्यामुळे माजी आमदार शंकरराव यांच्याविरुद्ध नेवासा येथील न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे.

शनिवारी आमदार गडाख यांना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशानुसार पोलिसांचा मोठा फौजफाटा काल सकाळी गडाख यांच्या सावेडी उपनगरातील निवासस्थानी दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह इतरही पोलिस फौजफाटा गडाख यांच्या निवासस्थानी दाखल झाला होता. पोलिसांनी शंकरराव गडाख यांच्या घराची झडती घेतली. मात्र घरात माजी आमदार शंकरराव गडाख आढळून आले नाहीत. न्यायालयाने त्यांना हजर होण्यास मुदतवाढ देण्याची मागणी फेटाळून लावल्याने आज दुपारी ते स्थानिक गुन्हे शाखेत स्वतःहून हजर झाले आहेत.