माजी आमदार तेजस्वीनी जाधव यांची रावसाहेब दानवेंच्या कन्येविरूध्द तक्रार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. जाधव यांची आई आणि माजी आमदार तेजस्विनी जाधव यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात आपली सुन आणि भाजपाचे खासदार रावसाहेब दानवे यांची कन्या संजना हिच्याविरोधात छळाची तक्रार दिली आहे. आपल्या सुनंने संजना हिने शिवीगाळ करुन धमकाविल्याची तक्रार तेजस्विनी जाधव यांनी दिली असून पोलिसांनी संजनाविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

तेजस्विनी जाधव या समर्थनगर येथे मुलगा हर्षवर्धन, सून संजना, नातवांसह राहतात. हर्षवर्धन यांचे पत्नीसमवेत पटत नाही. मात्र, घरातील वाद हा असा चव्हाट्यावर येईल व पोलीस ठाण्यात जाऊ शकेल, असे कोणाला वाटले नव्हते. जाधव या गुरुवारी दुपारी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांनी आपली सून संजना हिने घरगुती कारणावरुन शिवीगाळ केली असून वाटोळे करीन अशी धमकी दिल्याची फिर्याद दिली. सुनेच्या धमकीमुळे जगणे असह्य झाले असल्याचे त्यांनी या फिर्यादीत म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युती असतानाही रावसाहेब दानवे यांनी आपले जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत केल्याने आपला पराभव झाल्याचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप केला होता. जावयासाठी पक्षविरोधी कृती दानवे यांनी केली होती. तरीही जाधव यांच्या घरातील हा वाद शमला नव्हता, असे आता दिसून येत आहे.