माजी आमदाराच्या मुलाचा गोळ्या झाडून खून

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत एक धक्कादायक वृत्तसमोर आले आहे. माजी आमदार आणि स्वातंत्रसैनिक परशुराम नंदिहळ्ळी यांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अरुण परशुराम नंदिहळ्ळी यांच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अरूण हे ४९ वर्षांचे होते. बेळगाव-धामणे रस्त्यावर मंगळवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली.

मंगळवारी अरुण नंदिहळ्ळी धामणे येथील आपल्या सासरवाडीला गेले होते. सासरवाडीत जेवण करून ते स्विफ्ट गाडीतून बेळगावला परत येत होते. त्यावेळी धामणे रोडवर तीन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवली. या तिघांनी आपली तोंडे झाकलेली होती. गाडी अडवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि तिथून पळ काढला.

अरुण हे विश्व भारत सेवा समितीत होते. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या संस्थेतील हक्कावरून वाद सुरू होता. या संस्थेच्या अध्यक्षपदी परशुराम हे आहेत तर संचालकपदावर अरूण नंदिहळ्ळी हे होते. तसंच अनेक दिवसांपासून अरुण यांना अज्ञात फोनकॉल येते होते. एवढंच नाहीतर त्यांचे लोकेशनही शोधण्याचाही प्रयत्न केला जात होता, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, या प्रकरणाबद्दल बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. तसंच या हत्येमागे आर्थिक व्यवहार असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.