‘रोहयो’ घोटाळ्यात मनसेच्या जिल्हाध्यक्षाला अटक

फरार असताना राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत प्रचारात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – रोजगार हमी योजनेच्या काळात फरार असलेला मनसे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर याला स्थानिक गुन्हे शाखेने आज दुपारी ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्यात फरार असतानाही तो लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारात दिसून आला होता.

खेडकर याच्याविरुद्ध रोजगार हमी योजनेच्या कामात लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. न्यायालयाच्या आदेशावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात देविदास खेडकर हा फरार होता. फरार असतानाही तो खुलेआमपणे फिरत होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत तो दिसून आला. याबाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तरीही पोलिसांकडून खेडकर यांच्या अटकेची कारवाई केली जात नव्हती. अखेर आज दुपारी पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने खेडकर याला ताब्यात घेतले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खेडकर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आढळून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेकडून त्याला पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.